पावसाळ्याची सूचना देणारे - निसर्गाचे पोस्टमन
फुले म्हटली की आपल्याला उत्तराखंड येथिल Valley of Flowers, किंवा महाराष्ट्रातले कास पठार लगेच आठवते, असंख्य फुले फुलणारी ही दोन ठिकाणे पावसाळा संपल्यावर फुलतात एवढेच आपल्याला माहिती आहे, परंतु पावसाळ्याची सूचना देणारी म्हणजेच पोस्टमन असणाऱ्या अनेक फुलांच्या जाती आहेत ज्याकडे आपले दुर्लक्ष झालेले आहे.
पनवेल येथिल अनुभूती ग्रुपने एक wild flowers trail आयोजित करून सामान्य नागरिकांना निसर्गवाचन कसे करायचे ह्याची जणू कार्यशाळाच ह्या छोटेखानी कार्यक्रमात घेतली. आपल्याकडे प्रत्येक ऋतू बदलताना ज्या खूणा निसर्ग दाखवत असतो त्या कशा ओळखायच्या ह्याबद्दल सुध्दा अनुभूती365days चे सुदीप आठवले ह्यांनी सविस्तर सांगितले.
ह्या कार्यक्रमात वाघेरी (brittle Orchid) तसेच सीतेची वेणी अथवा गजरा (Fox Tail orchid) ह्या दोन वैशिष्ट्य पूर्ण प्रजातींबद्दल माहिती देत असताना इतर नेहमी दिसणाऱ्या परंतु दुर्लक्षित अशा शेवळे, कवके, जंगली मोगरा, लाजाळू, सुवर्ण क्षीर, धामण अशा अनेक विध फुले आणि वनस्पतींबद्दल श्री आठवले यांनी माहिती दिली, रविवारची सकाळ असुन सुद्धा २५-३० निसर्गप्रेमीनी ह्या संधीचा फायदा घेतला. अनुभूती365days ही संस्था पर्यावरण जनजागृती, रक्षण आणि शिक्षण ह्या क्षेत्रात कार्यरत असून सामान्य लोकांना निसर्गाकडे घेऊन जाऊन त्यांना निसर्गाचे महत्व समजावणे आणि ह्याच सामान्य नागरिकांना पर्यावरण रक्षण का गरजेचे आहे हे अश्या अनुभवांमधून उलगडून सांगणे हे संस्थेच कर्तव्य आहे असे अनुभूती365days च्या रुपाली पाटील ह्यांनी नमूद केले.